PostImage

pramod abhiman raut

Nov. 15, 2023   

PostImage

Ration Dukan ; रेशन दुकानावर मिळणार मोफत साडी


 

 अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना लाभ ; दरवर्षी एक असे वाटप

चिमूर प्रतिनिधी :-

        रेशन दुकानावर अन्नधान्याबरोबरच आता साडीही मिळणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भातील निर्णय घेतला आहे. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून, प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत मिळणार आहे. विशेष म्हणजे, शासनाने निश्चित केलेल्या सणादिवशी या साडीचे वाटप होणार आहे.
           चैत्र पाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी सणानिमित्त स्वस्त धान्य अर्थात् रेशन दुकानातून 'आनंदाचा शिधा देणाऱ्या राज्य सरकारने आता राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
          त्यानुसार राज्य सरकारने निश्चित केलेल्या सणाच्यावेळी दरवर्षी एक साडी लाभार्थीला दिली जाणार आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने शुक्रवारी या संदर्भातील शासननिर्णय जारी केला. राज्यातील २४ लाख ५८ हजार ७४७ अंत्योदय कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल. राज्य यंत्रमाग महामंडळ ही संस्था ही योजना राबवणार आहे. २०२३-२४ या वर्षाकरिता महामंडळ एक साडी ३५५ रुपयांना खरेदी करणार आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात प्रसिद्धी, साठवणूक, हमाली यासाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे.
          वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार ही योजना २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली आहे. राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांची संख्या २४ लाख ५८ हजार ७४७ इतकी आहे. या सर्व कुटुंबांना पुढील पाच वर्षे प्रत्येक वर्षी एक याप्रमाणे साडीचे मोफत वाटप केले जाणार आहे.